आठवड्यातील ७ ही दिवसांचे वार हे कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी आणि पर्यायाने देवदेवतांशी जोडले गेले आहेत. त्यानुसार कांही धार्मीक प्रवृत्ताचे लोक त्या विशिष्ट दिवशी, त्या विशिष्ट देवतेच्या प्रसन्नतेसाठी पुजाअर्चा, उपासना इ. करतात. उदा. सोमवार (चंद्र) शिवाचा वार (शंकराचा)वार, मंगळवार (ग्रह - मंगळ) आणि शुक्रवार (ग्रह - शुक्र) हे देवीचे वार, गुरूवार (ग्रह - गुरु) दत्त महाराजांचा वार, शनिवार (ग्रह - शनी) शनीदेवाचा तसेच हनुमानाचा वार, आणि रविवार ( तारा - सुर्य). हा मात्र कोणत्याही देवदेवताशी संबंधीत नाही. खरेतर सर्व ग्रहांना (आणि वरील संदर्भानुसार असलेल्या देवतांना) आपल्या गुरूत्वाकर्षणाने आपल्या अधीन ठेवणाऱ्या सुर्याला मात्र काहींच धार्मीक महत्व नाही हे जरा आश्चर्यकारक नाही का वाटत?
तसेच रविवारी कोणतीही उपासना हिंदु धर्मीय करत नाहीत. खाण्यापिण्यावर कोणतीही बंधने नसलेला हा निर्बंध, मुक्त सुट्टीचा वार. रविवार शिवाय कोणतेही निर्बंध नसलेला दुसरा वार म्हणजे बुधवार. खरेतर ‘ब्रम्ह’ देवाला समर्पित असा बुधवार. हिंदु धर्मातील ‘त्रिदेवां’पैकी एक अतिशय महत्वाच्या असलेल्या देवाचा वार. परंतु एका पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाचे पुजन संपुष्टात आलेले, म्हणून त्याची कोणी पुजा, उपासना करत नाहीत. सध्या काही लोक नवीन विचाराने बुधवार हा गणेशाचा वार मानतात. परंतू बुधवार हा वार गणेशाला समर्पित असे कोणी ठरवले आणि कोणत्या संदर्भातून? म्हणजे कोणता वार, कोणत्या देवाला समर्पित करायचा हे कोण ठरवतो आणि का, याला काहीच नियम किंवा संदर्भ नाहीत.
रवी (सुर्य) आणि बुध (ब्रम्हा) यांच्या नावे वार का असावा जेंव्हा ब्रम्हा पूजनीय नाही आणि सुर्य हा काही आध्यात्मिक देव नाही! प्राचीन काळी त्याचा तेजाने, उर्जेने प्रभावित झालेले, त्याच्या नियमित उगवण्या-मावळण्यावर जीवनाचा कार्यक्रम ठरणार असल्याने, सुर्याला दैवी शक्ति मानली गेली, देव नाही! उगवत्या व मावळत्या सुर्याला वाहत्या पाण्याचे अर्ध्य देऊन नमस्कार करणे इतपतच त्याची पुजा होत असे. आणि महत्वाचे म्हणजे त्रिदेवापैकी अजून एक महत्वाचा देव “विष्णू”, याला समर्पित असा वार का नसावा?
म्हणजेच वारांचा ग्रहांशी आणि ग्रहांच्या फक्त नावांशी संदर्भ आहे. परंतू धार्मिक, वैदिक किंवा अध्यात्मिक पध्दतीनुसार त्यांचा देवांशी संबंध नाही. म्हणूनच वारांचा धार्मिक किंवा दैवी संदर्भ अयोग्य ठरतो.
भारतीय कालगणना
सर्व जगांत भारतीय पंचांग ही एकच अशी काल गणना आहे, जी सुर्य निर्मित ऋतुचक्र आणि चंद्र कलेचे चक्र अशा दोन्ही खगोल शास्त्रीय घटनांवर आधारीत आहे. भारतीयांचे सर्व सण, धार्मिक कार्ये, मुहूर्त इ. सर्व हिंदू पंचांगानुसार येणाऱ्या महीना, ऋतु आणि तिथी, म्हणजेच चंद्र कलेवर आधारित असतात. उदा हिंदू पंचागानुसार नविन वर्षाची सुरवात ही ‘गुढीपाडवा’ या सणाने होते, आणि हा सण दर वर्षी ‘वसंरऋतु मध्ये, चैत्र महीन्याच्या, शुक्ल पक्षाच्या, प्रतिपदेला, म्हणजे अमावश्येनंतरच्या पहिल्या दिवसाला साजरा केला जातो. अशा या निसर्गचक्रावर आधारीत कालगणनेत, म्हणजेच पंचांगात, पंधरवढ्यातील दिवसांना तिथीची नांवे पुर्वीपासून आहेत, परंतु आठवड्याचे दिवस ठरलेले नव्हते आणि दिवसांना नावेही नव्हती, ती नंतर प्रस्थापित केली गेली.
“महाभारतात राशी, वार आणि करण यांचा संदर्भ सापडत नाही” असे, प्राचीन आणि आधुनिक ज्योतीषशास्त्राचे गाढे अभ्यासक शं. बा. दीक्षित हे त्यांच्या इ.स. १८९६ च्या ग्रंथात नमुद करतात. यावरून राशी, वार आणि करण हे महाभारतानंतरचे आहेत हे सिध्द होते. राशी आणि वार ही ग्रिकांची संकल्पना, नंतर ती भारतात स्थिरावली. भारतीय पंचांगाचा पाया हा २७ नक्षत्रांवर आधारीत होता. नंतर राशी आणि वारांची संकल्पना ग्रीकांनी आणली.
राशी आणि वारांची निर्मिती
ग्रीक विद्वानांनी भारतीय विद्वानांचे प्रगत खगोलशास्त्र शिकून घेतले. त्यांनी भारतीय २७ नक्षत्रांना महत्व दिले नाही. तर पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षणेच्या ३६० अंशाचे, भारतीय १२ महीन्याप्रमाणे १२ भाग केले आणि त्यांना राशी असे संबोधले. म्हणून प्रत्येक राशी ३० अंशांची मानली गेली. त्यानंतर ही राशी संकल्पना भारतीय विद्वानांनी मान्य करून आत्मसात केली.
वारांची संकल्पनासुध्दां ग्रीकांचीच. किती दिवसांचे एक चक्र (त्याकाळी “आठवडा” ही पध्दत नव्हती) हे निश्चित नव्हते. तेव्हां ग्रीक देवतांची नांवे त्यांनी दिवसांना दिली.
ती नांवे अशी - Ares, Hermes, Zeus, Aphrodite and Cronus.(पाच दिवस)
पुढे रोमनांनी ग्रीक देवतांची नांवे रोमन देवतांच्या नावें लिहीली,
ती अशी - Mars, Mercury, Jove (Jupiter), Venus, Saturn. (पाच दिवस)
तर जर्मनांनी त्यांच्या देवतांची नावें ग्रीक देवतांच्या जागी लिहीली,
ती अशी - Tiu (Twia) (Tuesday); Woden (Wednesday); Thor (Thursday); Freya (Fria) (Friday) & Saturn
वारांची शास्त्रोक्त रचना
भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ ‘आर्यभट्ट’ (इ. स. ४७६ ते इ. स. ५५०) याने वारांची शास्त्रीय रचना करण्याचे सुत्र त्याच्या ‘आर्यभट्टीय’ आणि ‘सुर्यसिध्दांत’ या ग्रथांतून मांडले. येथे हे लक्षांत घ्यावे कि प्रत्येक ग्रह सूर्याभोवती, सूर्यापासून विशिष्ट अंतरावरून, विशिष्ट गतीने फिरत असतो. चंद्र जरी ग्रह नसला तरी भारतीय पंचांगामधील त्याचे महत्व जाणून, आर्यभट्टाने त्याचाही या रचनेत समावेश केला, तसेच सुर्याचाही. ग्रहांची नांवे त्याने संस्कृत नावावरून घेतली. वारांची रचना करताना आर्यभट्टाच्या सूत्रानुसार, ‘मंदगतीच्या ग्रहापासून शीघ्रगतीच्या ग्रहापर्यंत ग्रहांची मांडणी करावी.’ त्यानुसार ग्रहांचा क्रम असा येतो - शनि - गुरु - मंगळ - सूर्य (रवि) - शुक्र - बुध - चंद्र (सोम).
सुत्राच्या संक्षिप्त पध्दतीनुसार ग्रहगतीच्या रचनेनुसार आलेल्या कोणत्याही ग्रहापासून सुरूवात करून पुढचे दोन ग्रह सोडून जो ग्रह येईल तो त्या दिवसाचा वार. उदा. वरील ग्रह क्रमानुसार शनी नंतर दोन ग्रह वगळून (गुरु आणि मंगळ) रवि येतो. म्हणून शनिवार नंतर रविवार घेतला. तसेच रविवार नंतर दोन ग्रह वगळून (शुक्र आणि बुध) चंद्र म्हणजे सोमवार येतो. अशा पध्दतीने वारांची शास्त्रीय रचना केली गेली.
आठवड्याची सुरुवात
आठवड्याची सुरुवात नक्की कोणत्या वारापासुन करायची हे ‘इंटरनॅशनल ॲारगनाझेशन फाॅर स्टाॅंडर्डस्’ या जागतीक संस्थेने जाहीर केले, त्याप्रमाणे सर्व जगांत ‘सोमवार’ हा आठवड्याचा पहिला दिवस मानला जातो.
वरील सर्व माहीतीवरून खालील दोन गोष्टी स्पष्ट होतात.
१) वारांची नावे आर्यभट्टाच्या सूत्रानुसार ठरवली गेली आहेत. त्यामूळे धार्मिक पध्दतीनुसार किंवा पौराणिक कथेनुसारसुध्दा वारांच्या नावांचा देवाशी कांही संबंध येत नाही. त्यामुळे वारानुसार देवाची पुजा, उपासना करणे धर्माला अनुसरून नाही.
२) आठवड्याची सुरुवात सोमवारपासून करायची याची अंमलबजावणी ब्रम्हभट्टाच्या काळांत म्हणजे इ.स. ५व्या किंवा ६व्या शतकात झाली. त्याआधी कोणत्याही दिवसाला जागतीक स्तरावर प्रमाणित असा वार नव्हता.
त्यामुळे सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस प्रमाणित झाला त्या दिवशी कोणताच वार नव्हता. म्हणुन आजचा दिवस सुध्दा त्याच विशिष्ट वाराचा, म्हणजेच त्या देवाचा आहे हे प्रमाणित होत नाही.
असे असताना आपण एखाद्या वाराला एखाद्या विशिष्ट देवाची उपासना का करायची? भारतीय पंचांगानुसार तिथी, नक्षत्र, ऋतु या प्रमाणे जे धार्मिक महत्वाचे दिवस येतात, त्याप्रमाणे उपासना करणे जास्त योग्य नाही का? उदा. वसंरऋतुमध्ये चैत्र शुक्ल नवमी दिवशी “श्रीराम नवमी”चा सण असतो, तर शरद ऋतुमध्ये अश्विन शुक्ल दशमी दिवशी ‘विजया दशमी’ म्हणजेच ‘दसरा’ सण असतो. अशा कोणत्याही धार्मिक महत्वाच्या दिवशी सुध्दा वाराला महत्व नाही. म्हणुन वारांना धार्मिक बैठक नाही, म्हणून धार्मिक किंवा अध्यात्मिक महत्वही नाही.
परंपरा व मानसिकता
आज प्रगत खगोलशास्त्रानुसार आणि हिंदू संस्कृतीच्या सखोल वैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेल्या संशोघनातून वरील गोष्टी स्पष्ट झाल्या. परंतू कालच्या आणि आजच्या पिढींमध्ये, वारांचा देवाशी लावलेला संदर्भ आणि त्यानुसार केली जाणारी उपासना हा कित्येक वर्षांचा उपक्रम आहे. तो सहज सोडणे किंवा तोडणे, मानसिकरित्या शक्य नाही. आणि तो उपक्रम सोडावा असा कोणाचाही आग्रह नाही. फक्त ही शास्त्रीय माहीती लक्षांत घेऊन, अंधश्रध्येने केली जाणारी उपासना पुढील पिढीवर लादू नये. त्यांना त्यांच्या विचाराने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य ठेवावे एवढीच अपेक्षा.